Saturday, 29 July 2017

स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन

आय.ए.एस., आय.पी.एस. व्हावा या स्वप्नांना उराशी बाळगत त्यासाठी पालक धावपळ करू लागतात. मग सुरू होतात चर्चेच्या फे ऱ्या. ज्यांना या परीक्षेची माहिती आहे किंवा ज्यांनी या परीक्षा दिल्या आहेत अथवा जे यशस्वी झाले आहेत, त्यांना गाठून पाल्याच्या भविष्याबाबत पालकांचे विचारमंथन सुरू होते.
स्पर्धापरीक्षेसंदर्भात महाराष्ट्रात परिस्थिती बदलायला लागली, डॉक्टर, इंजिनीअर, व्यतिरिक्तही स्पर्धापरीक्षेद्वारे प्रशासकीय सेवेत प्रवेश करणे हा एक पर्याय असू शकतो, हा विचार महाराष्ट्रात रुजायला लागला, ही दिलासा देणारी गोष्ट आहे. मात्र, या सर्व प्रक्रियेत काही सावधानता बाळगणेही आवश्यक ठरते.
पालकांची भूमिका
ज्यांच्या पाल्यांना स्पर्धापरीक्षेची तयारी करावयाची आहे किंवा ज्या पालकांची इच्छा आहे की डॉक्टर, इंजिनीअर किंवा सीए होण्यापेक्षा आपल्या मुला-मुलींनी स्पर्धापरीक्षेची तयारी करावी, त्यांना काही गोष्टी सुचवाव्याशा वाटतात. त्या पुढीलप्रमाणे आहेत-
१) जर आपण नक्की ठरवले असेल की, आपल्या पाल्याने स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून यशस्वी होऊन आय.ए.एस. किंवा आय.पी.एस. व्हावे किंवा आपल्याला आपल्या पाल्याला तसे वाटत असेल तर पदवीसाठी प्रवेश घेताना एवढेच लक्षात घ्या की, या परीक्षेसाठी पात्रता फक्त पदवी परीक्षा उत्तीर्ण असणे एवढीच आहे. पदवी कोणत्या शाखेतून घेतली, हे महत्त्वाचे नाही.
२) जर आपल्या पाल्याने डॉक्टर, इंजिनीअर यासारख्या अभ्यासक्रमात प्रवेश घेऊन नंतर ही परीक्षा द्यावी, असे आपल्याला वाटत असेल तरी हे लक्षात ठेवा की, कोणतीही पदवी घेताना पहिल्या वर्षांपासून या परीक्षेच्या तयारीस सुरुवात करणे योग्य ठरते.
३) ज्या पाल्यांना काही कारणांमुळे बारावीच्या परीक्षेत कमी गुण मिळाले असतील तर पालकांनी निराश होण्याचे कारण नाही. डॉक्टर, इंजिनीअर  यासारखेच स्पर्धापरीक्षा हे देखील एक करिअर आहे. त्यादृष्टीने बी.ए., बी.कॉम. किंवा बी.एस्सी.ला प्रवेश घेतल्यापासूनच या स्पर्धापरीक्षेची तयारी करण्यास आपल्या पाल्याला प्रेरणा द्या. पदवीच्या या तीन वर्षांचे उत्तम नियोजन केल्यास आपला पाल्य कमीत कमी वयात आय.ए.एस. किंवा आय.पी.एस. होऊ शकतो, हे लक्षात ठेवा. त्याच्या बरोबरीचे मित्र काय करीत आहेत, ते वैद्यक, अभियांत्रिकी किंवा इतर क्षेत्रांत किती यशस्वी झाले, याची आठवण आपल्या पाल्याला पुन:पुन्हा करून देत त्याचे मानसिक खच्चीकरण करू नका. त्याउलट बी.ए., बी.कॉम. किंवा बी.एस्सी. करताना या परीक्षेसाठी योग्य नियोजन केल्यास या परीक्षेत आपला पाल्य नक्की यशस्वी होऊ शकतो, याची खात्री बाळगा.
४) महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना आपला पाल्य या परीक्षेची व्यवस्थित तयारी करतो का, यावर बारकाईने लक्ष ठेवा. या परीक्षेसाठी जर तो तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेत असल्यास वेळ मिळाल्यास महिन्या-दोन महिन्यातून त्यांची भेट घेत त्यांच्याकडे मुलाच्या अभ्यासाबद्दल अवश्य चौकशी करा. तयारीच्या या कालावधीत आपल्या पाल्याला निराशा येणार नाही, याची काळजी पालकांनी घ्यायला हवी.
या वयात इतर अनेक गोष्टी युवावर्गाला आकर्षति करत असतात, अशा गोष्टींच्या आहारी जात आपला पाल्य ध्येयापासून भरकटणार नाही, यासाठी पालकांनी सजग राहायला हवे. तसेच  आपल्या पाल्यावर अवास्तव अपेक्षेचे ओझेही ठेवू नये. त्याला मनापासून या परीक्षेसाठी तयारी करू द्या.
काही गोष्टी आयुष्याच्या ऐन उमेदीच्या काळात विद्याथ्यार्र्ना कळत नसतात. त्यांना आपल्या ध्येयापासून भरकटू न देणे, नैराश्येचा कालावधीत त्यांच्यासोबत पालकांनी ठामपणे उभे राहायला हवे. स्पर्धापरीक्षेचा अभ्यास करताना- विशेषत: यूपीएससी परीक्षेची तयारी करताना कधी कधी खूप अभ्यास करूनही यश लवकर मिळत नाही. कधी कधी दोन-तीन प्रयत्नांनंतरही यश मिळत नाही, अशा वेळी या परीक्षेचा नाद सोडून देत आपल्या पाल्याने एखादी छोटी-मोठी नोकरी करावी, असे बहुतांशी पालकांना वाटते. त्यांचा विचार पूर्णपणे चुकीचा आहे, असे नाही, मात्र पहिल्या प्रयत्नात विद्यार्थ्यांनी जो अभ्यास केलेला असतो, त्याचा उपयोग पुढच्या प्रयत्नात होणारच असतो. यश विद्यार्थ्यांच्या अगदी निकट असते आणि अशा वेळी पालकवर्ग आपल्या पाल्यांना हा अभ्यास सोडून देत त्याने नोकरी करावी, यासाठी दबाव टाकीत असतो. सरतेशेवटी कंटाळून तो विद्यार्थी येईल त्या परीक्षेचा फॉर्म भरत सुटतो. ज्याला आय.ए.एस. व्हावयाचे होते व ते होण्याची ज्याची क्षमता होती तो बँॅकेतील कारकुनाची एखादी परीक्षा पास होतो, अनिच्छेने घरच्यांच्या दबावापोटी व वाढणाऱ्या वयाकडे पाहून तो ती नोकरी स्वीकारतो. आयुष्यभर जे करावयाचे नव्हते ते करत बसतो आणि दु:खी होतो. म्हणून पालकांनी हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे की, कधी कधी या परीक्षेत यशस्वी होण्यासाठी वेळ लागतो, तयारी करताना तो निराश होऊ शकतो, त्या वेळी त्याच्या पंखांना बळ देण्याचे काम पालकांचेच असते.
स्पर्धापरीक्षेची तयारी आणि महाविद्यालयाची भूमिका
बारावीनंतर जेव्हा विद्यार्थी महाविद्यालयामध्ये येतात, तेव्हा कॉलेजच्या मुक्त वातावरणात त्यांच्या सुप्त गुणांचा विकास होण्याच्या या काळात बऱ्याचदा मुलांचा रस्ता चुकण्याची शक्यता अधिक असते. कॉलेजमध्ये प्रवेश घेतल्यानंतर लेक्चर्स बंक करणे हा अलिखित नियम झालेला असतो. जेव्हा कॉलेज संपत येते, तेव्हा लक्षात येते की, आपण चांगल्या भविष्यासाठी स्पर्धापरीक्षेची तयारी करावयास हवी, त्यात एखाद्या यशस्वी उमेदवाराची मुलाखत वाचून आपण जास्तच प्रभावित होतो, पुस्तकांच्या दुकानात जातो, पुस्तक घेऊन येतो आणि अभ्यासाला सुरुवात करतो, अभ्यासासाठी सवय कधीच सुटलेली असते, अर्धा तासात पाठ दुखायला लागते. सर्व शक्ती एकवटून अभ्यासाला सुरुवात करतो. स्पर्धापरीक्षा समजून घ्यायला पुढची दोन वर्षे निघून जातात. अगदी गणिताच्या भाषेत बोलावयाचे झाल्यास पुढचे पाच वर्षे निघून जातात. वाढलेले वय, आपण काही करावे यासाठी पालकांकडून वाढणारा दबाव, यात भरकटलेला विद्यार्थी अजून भरकटत जातो, ही कहाणी काही एका विद्यार्थ्यांची नाही, ही महाराष्ट्रातल्या खूप विद्यार्थ्यांची आहे. पुणे, मुंबई, औरंगाबाद, नागपूर इ. शहरांचा विचार बाजूला ठेवला तर उर्वरित महाराष्ट्रात विद्यार्थ्यांची वाट अधिकच बिकट बनली आहे.
स्पर्धा परीक्षेत विशेषत: संघ लोकसेवा आयोगाच्या नागरी परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी म्हणजे आयएएस, आयपीएस होण्याची क्षमता मराठी तरुणांमध्ये पुरेपूर आहे आणि एम.पी.एस.सी. किंवा यू.पी.एस.सी. या परीक्षेचा अभ्यासक्रम सारखा झाल्यानंतर तर परिस्थिती अधिकच अनुकूल झाली आहे.
मात्र खेदाची गोष्ट ही आहे की, कॉलेजच्या तीन-चार वर्षांच्या दरम्यान जी तयारी व्हायला हवी ती होत नाही. यू.पी.एस.सी किंवा एम.पी.एस.सी परीक्षेच्या तयारीसाठी ही तीन वर्षे अत्यंत महत्त्वाची असतात आणि त्यांचा योग्य प्रकारे वापर व्हावा.
या परीक्षेसाठी लागणारा अभ्यास म्हणजे इतिहास, भूगोल, भारतीय संविधान, विज्ञान, अर्थशास्त्र यांचा अभ्यास अत्यंत सविस्तरपणे महाविद्यालयांमध्ये होऊ शकतो. महाविद्यालयातील प्राध्यापकवर्ग वेगवेगळ्या विषयांत पारंगत असतात, आपण त्यांची मदत घ्यायला हवी. महाविद्यालयामधील अभ्यासिकेत पुस्तकांचा वापर आपण करायला हवा. या परीक्षेसाठी लागणारी मदत कॉलेजमध्ये उपलब्ध होऊ शकते. विद्यार्थी ती मदत लक्षात घेत नाहीत.
महाविद्यालयीन शिक्षण घेताना विद्यार्थ्यांनी पुढील गोष्टी लक्षात ठेवाव्यात-
१) कॉलेजमध्ये प्रवेश घेतल्यापासून म्हणजे पदवीच्या प्रथम वर्षांपासूनच अभ्यासाला सुरुवात करावी म्हणजे आगामी तीन – चार वर्षांत यूपीएससीची तयारी खूप चांगल्या पद्धतीने होऊ शकते.
२) यूपीएससी व एमपीएससी परीक्षेच्या पूर्व व मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम व्यवस्थित अभ्यासून समजला नाही तर तज्ज्ञांकडून समजून घेऊन या अभ्यासक्रमातील प्रत्येक घटक संबंधित विषयांच्या प्राध्यापकांकडून समजून घ्यावा, ग्रंथालयात उपलब्ध असणाऱ्या अभ्यासक्रमासंबंधीच्या पूरक पुस्तकांचे वाचन करावे.
३) या कालावधीत इंग्रजीवर प्रभुत्व मिळविण्याचा प्रयत्न करावा. संपूर्ण यूपीएससी परीक्षा जरी मराठीत देता येत असली तरी इंग्रजीचे महत्त्व कमी होत नाही. निवड झाल्यानंतर प्रशासकीय कामात अनेकदा इंग्रजीचा संबंध येणारच असतो, याशिवाय यूपीएससीच्या पूर्व परीक्षेत काही उतारे फक्त इंग्रजीमध्ये असतात व मुख्य परीक्षेत ३०० गुणांचा एक इंग्रजीचा पेपर लिहावाच लागतो, जरी त्या गुणांचा वापर अंतिम यादीसाठी केला जात नसला तरी त्यात उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. उत्तीर्ण झालो नाही तर इतर पेपर तपासले जात नाहीत म्हणजे आपण परीक्षेत अपयशी ठरतो. महाविद्यालयाच्या पहिल्या वर्षांपासून जर आपण इंग्रजीच्या तयारीला प्राधान्य दिले, तर तीन वर्षांत इंग्रजीवर प्रभुत्व मिळवू शकतो. ही गोष्ट विशेषत: ग्रामीण भागांतून या परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी समजून घ्यावी.
४) संघ लोकसेवा आयोगाच्या तसेच इतर स्पर्धापरीक्षेसाठी गणित हा घटक महत्त्वाचा आहे. यूपीएससीच्या प्रारंभिक परीक्षेसाठी सी सॅटचा जो दुसरा पेपर आहे, त्यात गणिताचा हा घटक येतो, जरी हा पेपर फक्त गणितावरच आधारित नसला तरी ज्या विद्यार्थ्यांची गणितावर पकड घट्ट असते, त्यांना हा पेपर सोडवताना अडचण होत नाही व त्यांना या पेपरमध्ये जास्तीत जास्त गुण मिळून, मुख्य परीक्षेसाठीचा मार्ग सोपा होतो. कॉलेजच्या पहिल्या-दुसऱ्या वर्षांपासूनच या घटकाच्या तयारीला सुरुवात करावी, म्हणजे या घटकाच्या तयारीला जास्त वेळ देता येतो, शिवाय महाविद्यालयामधील प्राध्यापकांचीही यासाठी मदत होऊ शकते. एवढय़ा दोन-तीन वर्षांच्या काळात तयारी अशा प्रकारे होऊन जाईल की, कोणताही प्रश्न कसाही आणि कितीही अवघड आला तरी आपण आत्मविश्वासाने सामोरे जाऊ शकतो.
५) यूपीएससीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सर्वसामान्य प्रश्न असतो की, अभ्यासाला कुठपासून सुरुवात करावी? याचे उत्तर म्हणजे- ‘एनसीइआरटी’ची इ. पाचवी ते दहावीपर्यंतची सर्व विषयांची पुस्तके सविस्तर वाचावीत. विद्यार्थी पदवी घेऊन आलेला असतो, मात्र या परीक्षेसाठी लागणारा त्याचा पाया कमकुवत असतो, म्हणून या पुस्तकांचे वाचन करणे आवश्यक असते. पदवी घेतल्यानंतर या पुस्तकांचे वाचन करण्यापेक्षा पदवीचे शिक्षण घेत असतानाच ही पुस्तके वाचली असतील, त्यातील मुलभूत संकल्पना समजून घेतल्या असतील तर पुढचा अभ्यास करणे जास्त सोपे होते.
कॉलेजमध्ये असतानाच इतिहास, भूगोल, भारतीय संविधान, अर्थशास्त्राच्या मुलभूत संकल्पना यांचा अभ्यास करावा. जमल्यास त्यांच्या नोट्स तयार करून ठेवाव्यात.
शाळा-कॉलेजपासूनच स्पर्धापरीक्षेची तयारी करावी याचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटू लागले आहे. महाराष्ट्रातील कॉलेजमध्ये शिकविणारा प्राध्यापकवर्ग तज्ज्ञ आहे, मात्र या परीक्षेबाबत थोडी माहिती कमी असल्याने अभ्यासक्रम व स्पर्धापरीक्षेची तयारी याचा मेळ घालताना काही त्रुटी दिसून येतात. योग्य नियोजनाने त्या टाळता येऊ शकतात. महाराष्ट्रातील काही विद्यापीठांनीदेखील प्रत्येक महाविद्यालयात स्पर्धापरीक्षेची तयारी करून घेण्यासाठी स्वतंत्र विभाग सुरू केला आहे. त्या विभागावर आणखी चांगल्या पद्धतीने लक्ष देऊन व गरज पडल्यास त्यासाठी या परीक्षेची माहिती असणाऱ्या तज्ज्ञांकडून मदत घेतल्यास हा विभाग प्रभावीपणे कामगिरी करू शकतो. ज्यामुळे विद्यार्थ्यांची तयारी कॉलेजमध्ये असताना पूर्ण होते आणि अशा विद्यार्थ्यांना या स्पर्धात्मक जगात यश मिळवणे अधिक सोपे जाऊ शकते.
या सर्व प्रक्रियेत प्राध्यापकवर्गाची भूमिका महत्त्वपूर्ण ठरते. आगामी काळात हा सकारात्मक बदल झाल्यास कमी वयात या परीक्षेत यश मिळविणाऱ्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांची संख्या निश्चितच वाढेल.

No comments:

Post a Comment